जामण्यापाडा ग्रा.पं.चे सरपंच, ग्रामसेवक यांच्यावर कारवाईची सुचना
प्रतिनिधी, शिरपूर
तालुक्यातील जामण्यापाडा ग्राम पंचायतीचे सरपंच सरदार हरदास पावरा यांनी पदस्थापनेपासून म्हणजे ११/०२/२०२१ पासून तर आजतागायत मासिक सभा न घेतल्यामुळे त्यांना सरपंच पदावरून दूर करणे व त्यांचे सदस्यत्व रद्द करणे व ग्रामसेवक भास्कर एन. पावरा यांची बदली करण्याची लेखी तक्रार विलास पावरा व अन्य ग्रामपंचायत सदस्यांनी गट विकास अधिकारी पं. स. शिरपूर यांच्याकडे केली होती. सदर तक्रारीची सुनावणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. पं) जि. प. धुळे यांच्या दालनात संपन्न झाली. ज्यात ग्रामसेवक बी. एन. पावरा यांची विभागीय चौकशी व अन्य दोषिंवर कारवाई करण्याचे उपमुख्य कार्य. अधिकारी यांनी सुचित केले.
ग्रा. प. सदस्य विलास पावरा व इतर दोन सदस्य मिळून सरपंच व ग्रामसेवक यांची गट विकास अधिकारी, पं. स. शिरपूर यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची सखोल चौकशी करून गट विकास अधिकारी पं. स. शिरपूर यांनी दि. ०१/१०/२०२१ रोजी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. धुळे यांच्याकडे चौकशी अहवाल सादर केला. त्या अहवालानुसार दि. १६/११/२०२१ रोजी तत्कालीन ग्रामसेवक भास्कर एन. पावरा, चौकशी अधिकारी व तक्रारदार यांना सुनावणी नोटीस बजावण्यात आली. सदर तक्रारीवरून व चौकशी अहवालावरून दि. ३०/११/२०१ रोजी उप मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. धुळे यांच्या दालनात सुनावणी घेण्यात आली होती. त्यावर उप मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. धुळे यांनी तत्कालीन ग्रामसेवक भास्कर एन. पावरा यांना सुचित केले की, सदर कालावधी मध्ये आपण अजेंडे बजाविले नाहीत, मासिक सभा घेतली नाही, कोरम पुर्ण नाही, मासिक सभा न घेता ग्रामपंचायतीचा पैसा खर्च केला, घरपट्टी पाणीपट्टी बाबत विषय घेतला नाही, सदस्यांना नोटीसा बजावल्या नाहीत ही गंभीर बाब आहे. सदर ग्रामपंचायतीची व ग्रामसेवकांची विभागीय चौकशी सुरू करणे बाबत उप मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. धुळे यांनी गट विकास अधिकारी, पं. स. शिरपूर यांना सुचित केले. तसेच या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करावी असे संबंधित विस्तार अधिकारी (ग्रापं) पं. स. शिरपूर यांना सुचित केले.
सरपंच व ग्रामसेवकावर कारवाई |