Hot Widget

Type Here to Get Search Results !

History of Khajya Naik | क्रांतिवीर खाज्या नाईक |

१८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिवीर खाज्या नाईक एक महान योद्धा | History of Khajya Naik |


Adivasi TV India | भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी क्रांतिवीरांनी अनेक उठाव केले. यात संथालचा उठाव, कोल उठाव, भिल्लाच्या उठाव, मुंडा उठाव, कच्छमधील उठाव, पहाडी आंदोलन, गोंड आंदोलन,चुवार आंदोलन अशी अनेक उठाव आदिवासी क्रांतिवीरांनी इंग्रजांविरुद्ध केले. आदिवासींनी प्रखर लढे इंग्रजांविरुद्ध दिले. परंतु, त्यांच्या शूरपणांची दखल भारतीय इतिहासकारांनी घेतली नाही. भारतभूमी आदिवासींची मूळ भूमी असल्याने अन्यायाची चीड त्यांच्याच मनात प्रथम निर्माण होणे साहजिकच होते. त्यामुळे क्रांतीची मशाल पेटविण्यासाठी प्रथम आदिवासींचे हात पुढे सरसावले. उठावाची पहिली ठिणगी पेटवली. 


सातपुडा परिसर हा भिल्ल प्रदेश म्हणून ओळखला जातो. या परिसरात अनेक भिल्ल नायकांनी इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला. यात तंट्या मामा भिल्ल, भीमा नाईक, खाज्या नाईक, दौलत नाईक, कुवरसिंग वसावा, भागोजी नाईक, गुमानसिंग नाईक, दिपत्या पाडवी(भिल्ल), मेवाश्या नाईक या भिल्लाच्या संघर्ष भारतीय लढ्यातील काही सोनेरी पाने आहेत. परंतु, दुर्दैवाने त्यांच्या स्वातंत्र्य लढ्याची फारशी नोंद घेतली गेली नाही.


       १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महान आदिवासी योद्धा म्हणजे खाज्या नाईक. खाज्या नाईक १८३१ ते १८५१ पर्यत ब्रिटिशांच्या नोकरीत होते. आग्रा-मुंबई रस्त्यावरील सैंधवा घाटातुन प्रवास करणाऱ्या व्यापारी व प्रवाशांना संरक्षण देण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. घनदाट जंगलातुन जाणाऱ्या शेकडो बैलगाड्यांना संरक्षण देणाऱ्या पोलीस पथकांचे प्रमुख होते. परंतू, एका दरोडेखोर हत्येप्रकरणी खोट्या केसमध्ये त्यांना १० वर्षांची शिक्षा सुनावली. 


खाज्या नाईक यांना खुनाच्या आरोपाखाली कारागृहात टाकल्यानंतर मुंबई-आग्रा रोडवरील भिल्ल समाजातील तरुणांने हल्ले वाढले. संपूर्ण खान्देश भागात ब्रिटिशांविरूद्ध तीव्र आंदोलने सुरू झाले. भिल्लाच्या या वाढत्या आंदोलनावर नियंत्रण मिळविण्यासाठी, चांगल्या वर्तणुकीचा दाखला देत, त्यांना पाच वर्षे आधीच सोडले. व पुन्हा ब्रिटिश सैन्यांत सामील होण्यास सांगितले. परंतु, खाज्या नाईक यांनी स्पष्ट नकार देऊन स्वतंत्र सशस्त्र सेना उभी करण्यास सुरुवात केली. कालांतराने त्यांना भीमा नाईक, दौलत नाईक, रमल्या नाईक, बाळू नाईकसह काही महत्त्वाचे साथीदार मिळाले. व ७०० भिल्ल तरुणांना जमवून, सशस्त्र प्रशिक्षण देऊन ब्रिटीशांना मदत करणाऱ्या सावकारांच्या घरी दरोडे टाकण्यात सुरुवात केली. 


खाज्या नाईक यांनी बंडाचे निशाण उभारल्याबरोबर खान्देशातील शेकडो भिल्ल सैन्यात दाखल झाले. आणि सैंधवा घाट काबीज करून ब्रिटिशांच्या येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांवर करवसुली करण्यात सुरुवात केली. अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांवरील हल्ल्यामुळे ब्रिटिश सरकार जेरीस आले. त्यांची लूटमार, दरारा दिवसेंदिवस वाढत होता. त्यामुळे इंग्रज अधिकाऱ्यांना मुंबई-आग्रा रस्ता असुरक्षित वाटू लागला. १७ नोव्हेंबर १८५७ साली खाज्या नाईकांनी तीनशे तरुणांसोबत जांभळी चौकात ब्रिटिशांच्या खजिना लुटला. या लुटीत ७ लाख रुपयांचा तत्कालीन चांदीची चलनातील नाणी होती. अफूने भरलेल्या गाड्यांही लुटल्या. या लुटीने ब्रिटिशांचे धाबेच दणाणले. ब्रिटिशांचे पोस्ट ऑफिसदेखील लुटले. टेलीग्राफचा ताराही तोडल्या. त्यामुळे ब्रिटिशांच्या दळणवळणार, संपर्कावर मोठा परिणाम झाला. 


लुटलेल्या खजिनातून शस्रे खरेदी केलीत. व पैसा, खजिना गरीब लोकांनाही वाटला. २६ नोव्हेंबर १८५७ ला शिरपूर लुटले. सुलतानपुर भिल्ल सेनेने सारंगखेडा गावावर हल्ले चढविले. व ब्रिटीशांना सळो कि पळो करून सोडले. हतबल झालेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी खाज्या नाईकांना पकडण्यासाठी २ हजार रुपयांचे बक्षीस ही जाहीर केले.


         ११ एप्रिल १८५७ रोजी ब्रिटिश सरकारला खाज्या नाईक आपल्या साथीदारसह मध्य प्रदेश सीमालगत शिरपूरजवळील आंबापाणीचा जंगलात असल्याची माहिती मिळते. मेजर ईव्हान्स आपल्या सैन्य व  अत्याधुनिक शस्त्र।सह त्या परिसराला  घेराव घालून हल्ले चढवितात. भिल्ल समाजातील सैनिक एकत्रित येत ब्रिटिश सैन्यांवर तिरकमात, गोफण, तलवार, भोले यासारख्या पारंपरिक हत्याराने दिवसभर झुंज देतात. भिल्लाच्या सैन्याने २ ब्रिटिश अधिकार व १३ सैनिक ठार केले. या लढाईत ६५ भिल्ल सैनिक हुतात्मा झाले. शेकडो महिलाही ब्रिटिश सैन्याविरुद्ध लढल्या. ५७ सैन्यांना ड्रमचा आवाजावर गोळ्या घालण्यात आल्या. कुठल्याही आधुनिक शस्र। शिवाय भिल्ल सैनिकांनी निधड्या छातीने ब्रिटिश सैन्याशी दिलेला हा लढा इतिहासात अजरामर झाला. 


१८५७ च्या उठावात खान्देशातील आदिवासी क्रांतिवीरांचे योगदान जस्टिस मॅकोर्थीने 'हिस्ट्री ऑफ युवर ऑन टाइम्स'या आत्मवृत्तात म्हटले आहे की, हा उठाव  दक्षिण भारतापर्यत पोहचला होता. एल्फिन्स्टनेही अहवालात नमूद केले आहे. याबाबत ब्रिटिशकालीन पुरावे उपलब्ध आहेत. अशा महान योद्धाने मातृभूमीसाठी लढता लढता आपल्या साथीदारसह प्राणाची आहुती दिली.


   - ✍️ राजेंद्र पाडवी, राज्यमहासचिव बिरसा फ़ायटर्स मो.९६७३६६१०६०

१८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिवीर खाज्या नाईक एक महान योद्धा | History of Khajya Naik |
१८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिवीर खाज्या नाईक एक महान योद्धा | History of Khajya Naik |

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.