प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभासाठी बँक खाते आधारशी जोडणे बंधनकारक | Pradhan mantri kisan sanman yojna
Adivasi TV India: नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा माहे डिसेंबर 2022 ते मार्च 2023 या कालावधीतील तेराव्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी योजनेतील पात्र लाभार्थ्यांची बँक खाते आधारशी जोडणी करणे बंधनकारक आहे. असे निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ आधारशी संलग्न बँक खात्यामध्येच प्राप्त होणार असल्याने ज्या लाभार्थ्यांनी अद्यापही त्यांचे बँक खाते आधारशी संलग्न केलेले नसेल अशा प्रलंबित लाभार्थ्याचे बँक खाते इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत (आयपीपीबी) खाती उघडण्याची व ते खाते आधार क्रमांकाशी जोडणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे. नंदूरबार जिल्ह्यात 14 हजार 993 लाभार्थ्यांनी पीएम किसान लाभार्थ्याचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणी केलेले नाही, अशा प्रलंबित लाभार्थ्याची तालुका व गांवनिहाय यादी पोस्ट कार्यालयास उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी आपले बँक खाते आधार संलग्न करण्यासाठी आपले आधारकार्ड व मोबाईल क्रमांक जवळच्या पोस्ट कार्यालयात जावून आपले खाते आधार क्रमांकास जोडून घ्यावे जेणे करुन अनुदानाचा लाभ अखंडीतपणे घेता येईल असे आवाहन श्री.खांदे यांनी केले आहे.