Hot Widget

Type Here to Get Search Results !

धजापाणीच्या डोंगरदऱ्यातील एकलव्याचा लक्ष्यभेद! डॉ अर्जुन पावरा उपजिल्हाधिकारी; MPSC 2021 परिक्षेत ST प्रवर्गात महाराष्ट्र राज्यात प्रथम

धजापाणीच्या डोंगरदऱ्यातील एकलव्याचा लक्ष्यभेद! डॉ अर्जुन पावरा उपजिल्हाधिकारी; MPSC 2021 परिक्षेत ST प्रवर्गात महाराष्ट्र राज्यात प्रथम
डॉ. अर्जुन पावरा, उपजिल्हाधिकारी

धजापाणीच्या डोंगरदऱ्यातील एकलव्याचा लक्ष्यभेद! डॉ अर्जुन पावरा उपजिल्हाधिकारी; MPSC 2021 परिक्षेत ST प्रवर्गात महाराष्ट्र राज्यात प्रथम


Adivasi TV India: सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या धजापाणी डोंगरदऱ्यातील आदिवासी भागाततील डॉ. अर्जुन पावरा यांनी MPSC 2021परिक्षेत ST प्रवर्गात महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. थेट उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली आहे.


रस्ता नावाची गोष्ट अगदी काही दोनचार वर्षांपूर्वी ज्या गावात आली, जे गाव आजही गुगल मॅपवर शोधून सापडणार नाही अशा 'धजापाणी' गावाचे सुपुत्र, आमचे बंधू डॉ अर्जुन गुंजाऱ्या पावरा यांनी MPSC (राज्यसेवा) परीक्षेत घवघवीत यश मिळवून गावाचे नाव रोशन केले.


स्पर्धा परीक्षांचं प्रचंड आकर्षण आणि अप्रूप असलेल्या पिढीतले आपण, तरी रुळलेल्या वाटा सोडून जाणे मला जमले नाही. तूही डॉक्टरकीची पदवी घेतली, थोडीफार प्रॅक्टिसही केली पण स्पर्धा परीक्षेचा किडा स्वस्थ बसू देत नव्हता, अशा वेळी वयाची तिशी जवळ असताना स्पर्धा परीक्षेचा अनिश्चित आणि खडतर मार्ग पत्करणे हा तुझा खरोखर मोठा निर्णय होता. 


सण, समारंभ, नातलगांच्या भेटीगाठी, घरगुती अडचणी सारं टाळून तयारी वर लक्ष केंद्रित ठेवणं सोपं नव्हतं. फक्त मोठा निर्णय घेतला म्हणजे झालं असं नसतं तर त्या तोडीची यत्नांची शिकस्त करावी लागते, समर्पण लागतं, ते तू १००% दिलयस यात शंका नाही. गेल्या ५ वर्षात आपण केवळ दोनदा भेटलोय यातच सर्व आलं!


आज यश मिळाल्यावर कौतुक करणारे, डोक्यावर घेऊन नाचणारे गेल्या ४-५ वर्षातील खडतर काळात कुठेच नव्हते असाही विचार अर्जुनच्या मनात असेल पण तसं नाहीये रे!


आठवतंय सुट्ट्यांमध्ये जेव्हा आपण आजोळी जमायचो ते दिवस! झाडाच्या अवघडातल्या अवघड फांदीवर जाऊन आंबे तोडून आणायचा तुझा हट्ट काट्यात पडू पडूनही शमत नसे. नदीच्या काठाशी असलेल्या बिळात हात घालून खेकडे शोधून काढायची तुझी जाम मस्ती पाहून आमचीच टरकायची,पण तू काही मानायचा नाही. आता तुझं अभिनंदन करायला धैर्य, जिद्द, चिकाटी असे गोड गोड शब्द वापरलेत पण या यशाकामी मदतीला आलेला हा तुझ्या अंगीचा जन्मजात कंड आम्ही लहानपणीच अनुभवलाय. त्यामुळे एकदा जिद्दीने पेटला की तू सोडणार नाही हे सगळ्यांच्याच मनात होतं, भले थोडा वेळ गेला, पण तू आमचा विश्वास सार्थ ठरवला. 


MPSC च्या लाटेत वाहून जाऊन कडेला निपचित साठणाऱ्या ओंडक्यांसारखे शेकडो उमेदवार गळून पडतात. अशा स्पर्धेत उतरताना ना विषयांचा अनुभव, जीवघेणी स्पर्धा, अभ्यासाचा मोठा आवाका, मेडिकल क्षेत्रात घालवलेला पाच सात वर्षांचा खंड, 'काय करतोय सध्या' वैग्रे खोचक प्रश्न करणारी मंडळी हे सर्व सहन करत गाठलेलं हे यश अमूल्य आहे. या सर्व काळात तू कुठल्या मानसिक अवस्थेतून गेला असशील याची मला कल्पना आहे. त्यामुळे, आता रँक किती,आवडीची पोस्ट मिळेल न मिळेल या सर्व गोष्टी दुय्यम आहेत. तुला जे सिद्ध करायचं होतं ते केलयेस. 


असो, आता लै ग्वाड लिहत नाही. डावखोऱ्या हाताने लाकडाच्या गुलेलने धजापाणीच्या रानावनात चिडया मारत फिरणाऱ्या अर्जुनने शेवटी MPSCचा लक्ष्यभेद केलाच, याचा आनंद आभाळभर आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.