Hot Widget

Type Here to Get Search Results !

धुळे जिल्हा पोलीस अधिक्षकांनी हेड मास्तरांची भूमिका पार पाडावी!

धुळे जिल्हा पोलीस अधिक्षकांनी हेड मास्तरांची भूमिका पार पाडावी!


धुळे: धुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडते आहे. सामान्य जन-मानसातील भीतीचे वातावरण वाढत आहे. घरफोड्यांच्या वाढलेल्या घटनांमुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे. अवैध व्यवसायांना ‘उधाण’ आले आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधिक्षकांनी ‘हेड मास्तरांची’ भूमिका पार पाडावी  अशी अपेक्षा जन-मानसातून व्यक्त होत आहे.


जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधिक्षक ऋषिकेश रेड्डी दोन्ही पोलीस अधिकारी तरूण आहेत. त्यांच्या कामांची पध्दत देखील चांगली आहे. असे असले तरी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचा कारभार अपेक्षेप्रमाणे, चोखपणाने दिसत नाही. त्यामुळे शाळेतील सर्व वर्गांवर फेरी मारणार्‍या हेड मास्तरांप्रमाणे पोलीस अधिक्षकांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे ‘राऊंड’ घ्यावेत आणि ढिसाळलेल्या आपल्या वर्ग शिक्षकांच्या कामगिरीवर नियंत्रण ठेवावे, अशी जनभावना निर्माण झाली आहे. 


या जिल्ह्यात पोलीस अधिक्षक संजय बारकुंड आणि अपर पोलीस अधिक्षक ऋषिकेश रेड्डी जवळपास वर्षांपूर्वी रुजू झालेत आणि दोन्ही अधिकार्‍यांनी ज्या पध्दतीने अवैध व्यवसायांवर कामगिरीचा जो धडाका लावला होता तो कौतूकास्पद होता. त्याचे आम्ही वेळोवेळी कौतूक देखील केले आहे. अवैध दारूच्या भट्ट्या, गुंगी आणणार्‍या औषधांच्या लहान बाटल्या, ज्या गुजरात राज्यातून येतात, गांजा शेती, बनावट अवैध विदेशी मद्याचे कारखाने, गुजरात, मध्यप्रदेशातून आणला जाणारा कोट्यावधींचा गुटखा, गो-तस्करीत कत्तरखान्यात वाहून नेली जाणारी सुदृढ गुरे, मध्यप्रदेशातून कत्तलीसाठी होणारी गुरांची अवैध वाहतूक जी मालेगांव, भिवंडीपर्यंत जाते शिवाय चाळीसगावकडून औरंगाबादकडे सुध्दा जातांना दिसते.


चैन स्नॅचिंगच्या घटना, जिल्ह्यातील चारही तालुक्यांमध्ये वाढलेल्या घरफोड्याचें प्रमाण, दिवसा-ढवळ्या चोरीस जाणार्‍या मोटर सायकलींची वाढलेली संख्या, पळवून नेल्या जाणार्‍या अल्पवयीन मुलींचे घटनाक्रम वाढत आहेत. शेतातून शेतकर्‍यांच्या कृषि साहित्याची होणार्‍या चोर्‍यांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांचा कारभार ‘ढिसाळ’ पध्दतीने सुरू आहे. लामकानीत एकाच दिवशी झालेल्या तीन घरफोड्या आणि लंपास झालेला पंधरा लाखांचा ऐवज, धुळे शहरातील हमाल मापाडी प्लॉट येथील दोन घरफोड्यांसह घरफोड्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. साक्री, शिंदखेडा, शिरपूर व धुळे या चारही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घरफोड्या सुरू आहेत. सर्वत्र अवैध धंद्यांचा सुळसुळाट आहे. यावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. 


दुचाकी लांबविणार्‍या टोळ्या सक्रीय आहेत. त्यांचा शोध लावण्याची गरज आहे. ग्रामीण भागात शेतकर्‍यांचे शेतीतील साहित्य चोरण्यार्‍या घटना वाढल्या आहेत. यावर संबंधित पेालीस ठाण्यांचा ‘वचक’ राहिलेला नाही. धुळे शहरातील वाढतील गुंडगिरी हा कायमस्वरूपी न सुटणारा प्रश्न आहे. एका स्त्रीवर अत्याचार करून तिला जाळण्याचा नुकताच झालेला प्रयत्न, शेतकर्‍यावर धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झालेला हल्ला या सर्व घटना जिल्ह्यासाठी आणि पोलीस प्रशासनासाठी आव्हान देणार्‍या आहेत. 


गुंडांचे शहर म्हणून या शहराची ओळख होवू नये अशी जनभावना आहे. या जिल्ह्यात चांगल्या पध्दतीने काम करणारे आणि गुंडगिरीचा, अवैध व्यवसायांचा बिमोड करणारे अधिकारी येवून गेलेत. तत्कालिन पोलीस अधिक्षक किरणकुमार पाटील, एस. चैतन्य यांच्यासारख्या अधिकार्‍यांनी आपल्या कामगिरीतून जिल्ह्याची प्रतिमा उंचावली आहे. 


जिल्हा पोलीस अधिक्षक संजय बारकुंड आणि डीवायएसपी ऋषिकेश रेड्डी आपण देखील अवघ्या चोवीस तासात अनेक गुन्ह्यांचा तपास लावून आपल्या कार्यपध्दतीचे कौशल्य दाखविले आहे. परंतू आपल्या जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील ढिसाळ कामकाजावर जनतेतून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. संतप्त भावना उमटत आहेत. देवाण-घेवाणीचे आरोप होत आहेत. यासाठी हेड मास्तरांची भूमिका पोलीस अधिक्षकांनी स्विकारावी व पाट्या टाकणार्‍या मास्तांराचा केवळ शोध घेवू नका तर त्यांच्या तडकाफडकी बदल्या करा. काही मास्तर जास्तच ‘धुम’ करीत आहेत, त्यांचाही समाचार घ्या. त्यांची नावे जाहीरपणे आम्ही लिहु शकतो. परंतू हेड मास्तर या नात्याने त्यांचे कामकाजाचे ‘पर्सनल रिपोर्ट’ आपल्याकडे असतीलच. त्यामुळे आपल्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उभे राहू नयेत अशी आमची भूमिका आहे. 


जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळणार नाही यासाठी आपल्या कर्तव्यदक्ष भूमिकेची अपेक्षा जनतेला आहे. ताबडतोबीने यावर कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा आहे. तूर्तास एव्हढेच ....!



साभार: दैनिक पोलीस शोध, संपादकीय 

दि. 24/05/2023 लेख.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.