मासे खाल्ल्यामुळे ऐश्वर्या रायचे डोळे सुंदर:विजयकुमार गावित यांचे अजब विधान; म्हणाले - मासे सेवन केल्याने बाईमाणूसही चिकने दिसतात व लगेच पटतात
Adivasi TV India: ऐश्वर्या रायचे डोळे मासे खाल्ल्यामुळे सुंदर दिसत असल्याचे अजब मत आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी केले आहे. ऐश्वर्याचे डोळे मासे खाल्ल्यामुळे सुंदर दिसतात. माशांमुळे त्वचा तरतरीत होऊन बाईमाणूसही चिकनी दिसते, असे ते म्हणालेत.
विजयकुमार गावित यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नेते आहेत. त्यांनी एनसीपीत असताना अनेक महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी पार पडली. त्यानंतर ते भाजपत गेले. सध्या त्यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रालयाचा पदभार आहे. त्यांनी धुळे जिल्ह्यातील अंतुर्ली येथे आदिवासी मच्छिमारांना मासेमारीचे साहित्य वाटप करताना अभिनेत्री ऐश्वर्या रायचे डोळे सुंदर का दिसतात? याचे वादग्रस्त कारण सांगितले आहे.
ऐश्वर्याचे डोळे अन् मासे
तुम्ही ऐश्वर्या राय पाहिली ना? ती समुद्राच्या किनारी राहणारी. ती बंगळुरुतील समुद्रकिनारी राहते. ती दररोज मासे खायची. तुम्ही तिचे डोळे बघितले ना? तुमचेही डोळे तिच्यासारखे होतील. मासे खाण्याचा हा फायदा आहे, असे विजयकुमार गावित उपस्थितांना मासे खाण्याचे फायदे सांगताना म्हणाले.
माशांचे तेल अन् बाईमाणूस
मासे खाल्ल्यामुळे बाईमाणूस चिकनी दिसते, असेही ते यावेळी म्हणाले. मासे खाण्याचे 2 फायदे आहेत. एक मासे सेवन केल्यामुळे बाईमाणूस चिकनी दिसायला लागते. दोन डोळेही तरतरीत दिसतात. आपली त्वचाही चांगली दिसते. माशांत एक प्रकारचे तेल असते. त्या तेलामुळे डोळ्यांवर परिणाम होतो. यामुळेच शरीराची त्वचाही चांगली दिसते, असे विजयकुमार गावित म्हणाले.