आदिवासी समाजाची दिवाळी कशी असते?
Adivasi TV India: आपल्या आदिवासींची दिवाळी ही शहरी आणि पौराणिक दंत कथापेक्षा आगळी वेगळी आणि डोळ्यांचे पारणेफीटणारी असते,आपल्या आदिवासींच्या दिवाळीचे महत्व म्हणजे त्यांचा प्रकृती बद्दल आदर.
आपल्या आदिवासी दिवाळीच्या
पहिल्या दिवशी
आपल्या दिवाळीच्या पहील्या दिवशी शेतातील भात, मका,ज्वारीच्या पिकांची कापणी करून माळराणावर वाळत ठेवलेल्या या पिकांच्या कणसांना दारा समोरील अंगण हे गाईच्या शेणाने सारवले जाते आणि जागा स्वच्छ करून भात म्हणजे हाव दारासमोरील अंगणात आणून ठेवली जाते आणि या पिकाची पुजा केली जाते नंतर हे सर्व साफ करून पुजलेलं धान्य आणि सर्व पिके घरात मानपुर्वक आणुन कणग्या भरल्या जातात.
दुसरया दिवशी
या कणग्यांच्या मधुन हाव(भात) काढुन *उखळ पुजुन* त्यात डुंडण्या कुटल्या जातात आणि शुभ्र तांदुळ हा त्याच्या फोलपाटान पासुन वेगळा केला जातो. आणि त्या सोबत मका ज्वारी सारख्या पिकांना ही साफ केलं जातं आणि नवा तांदुळाचा भात बनवुन थोडा वेगळा काकडी, ज्वारी-बाजरीची कणसं मका यांसह मुवड्याची दारू ही प्याल्यात घेऊन हे सगळं पळसाच्या पानावर घराबाहेर, कुलदेवी गिरहण मातेसमोर, घराच्या छपरावर, दरवाजाच्या ऊंबरयावर ओट्यावर, अंगणात ठेवुन कुळदेवी गिरहण (प्रकृती) माता, दरवाजा (जुपुराया) निसर्ग आणि नवाय पुजन पुर्वजांना अर्पन केले जाते याच दिवशी गावाचे पाटील आणि मोठे लोकं हे गावाच्या अणवत देव (गांवदेव,हिंदू संस्कृती ने त्याला हनुमान बनवलं)समोर काकडी आणि इतर पिकांची कणसं ही ठेवली जातात आणि गावदेवाची पुजा करून तेथुन काही कणसं आपआपल्या घरी आणली जातात आणि घरावर ठेवली जातात आणि काही घरात आणली जातात आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते.
तिस-या दिवशी
म्हणजे *डाखनचवदेह* (नरकचतुर्थी) या दिवशी पहाटे शेतामध्ये, शेताच्या बांधावर, माळराणात, घरात, दरवाजाच्या ऊंबरयावर, अंगणात खिडक्या, आणि सगळ्या जागेवर मातीचे दिवे ठेवले जातात आणि पहाटे पहाटे ऊठुन कुंडो म्हणजे माठ आणि इतर पाण्याने भरलेले भांडे हे खाली करून स्वच्छ धुवून ताज्यास्वच्छ पाण्याने भरले जातात कारण या दीवशी मच्छरांसारखे परजीवी हे जमलेल्या पाण्यात अंडे देतात रोगराई पासून बचाव करण्यासाठी असे केले जाते आणि या अमावस्येच्या काळ्या रात्री डाखन(चेटकीन) हडाळ सारख्या प्रकृतीक रचना अंघोळ करतात अशी एक आख्यायीका आहे.
याच दीवशी याहमोगी (समृद्धी, धन,संपदेची, आरोग्याची, अमुल्य धनसंपदेची प्रतीक आणि ईच्छापुर्तीची आणि आदिवासीवर आपली कृपादृष्टी राखणारी आणि आराध्य दैवत असणारया देवी), आहत्याबामन (पावसाचं नियंत्रण करणारे देव आणि साप आणि इतर सरीसृपांवर नियंत्रीत करणारे देव), राणी काजल (आकाशाची, पावसाची आकाशाच्या तेजाची शक्तींवर नियंत्रण असणारया देवी) अशा मोठ्या देवांसमोर आदिवासी बुडव्यांनद्वारे (पुजारी आणि इतिहासकार) दीवे ठेवले जातात. या देवांना दीवे दाखवल्याने वर्षभर शेतात काम करणारया शेतकरयांना साप आणि इतर प्राण्यांचा उपद्रव होत नाही अशी धारणा आहे.
चवथ्यादीवशी
( म्हणजे लक्ष्मीपुजनाला हिंदू धर्मात) पावरा समाजात घरातील नांगर,फाळ,कुदाळ इतर शेतीची अवजारे, भांडे पाण्याचे कुंड,दरवाजा,कुळदेवी गिरहण माता, घरगुती सामानाची पुजा तसेच गाई म्हशी पशुधनाची पुजा केली जाते आणि तांदळाची आणि गव्हाची गोड राबडी ही देवाला अर्पण करून घरात सगळ्यांचं तोंड गोड केलं जातं.
पाचव्या व सहाव्या दिवशी
गावाचे पाटील आणि मोठे लोकं हे गावाच्या गांवदेवते समोर काकडी आणि इतर पिकांची कणसं ही ठेवली जातात आणि गावदेवाची पुजा करून तेथुन काही कणसं आपआपल्या घरी आणली जातात आणि घरावर ठेवली जातात आणि काही घरात आणली जातात या पुजनाला *गांवदेवपुजन* म्हंटले जाते गावाची सीमापुजली जाते आणि या पुजनाला *गावपांडरी पुजली* असे म्हटले जाते,
हे पुजन हे दसरयाच्या वेळी, दिवाळी कालखंडात आणि वाघदेव पुजन या तीन पुजनांवेळी केलं जातं.
सातव्या दिवशी
भावबिजेला बहिण भावाघरी येऊन भावाला ओवाळते आणि आपल्या भावाला भेटवस्तु देते आणि आपल्या माहेरी आईवडीलाना भेटुन काही दिवस राहुन आपल्या परत जाते . सरकारी दिवाळीच्या एक महिन्यांनंतर गावात गाव दिवाळी साजरी केली जाते.
ही दिवाळी एक तर गावचा पाटील नाहीतर एखाद्याचा नवस असल्यास साजरी केली जाते या दिवाळीत ढोल मांदल, पावरी(बासरी),थावी(थाळी) यांसारख्या वाद्यांना मुवड्याची दारू, भात , यांनी पुजून दिवा लावुन शेंदूराचे टिळे देऊन तांदळाच्या अक्षदा देऊन हे वाद्य वाजवून या वाद्यांच्या तालावर संवांग्या आणि गावकरी नाचुन गावदिवाळी साजरी करतात आणि दिवाळीचा आनंद लुटतात. ही दिवाळी फटाक्याविना साजरी केली जाते.
लेखक संकलन - डॉ.विजयसिंग पवार (अंबापूर)