Hot Widget

Type Here to Get Search Results !

वाघदेव, वसू बारस दिवाळी साजरी कशी करतात; माहिती जाणून घ्या!

वाघदेव, वसू बारस दिवाळी साजरी कशी करतात; माहिती जाणून घ्या!

वाघदेव, वसू बारस दिवाळी साजरी कशी करतात; माहिती जाणून घ्या!


Adivasi TV India: वाघदेव,वाघोबा हे सह्याद्रीतील बहुतेक आदिवासीं मधील प्रमुख दैवत आहे. वाघदेवाची स्थानके आदिवासींच्या विविध भागात आढळतात. वाघाने त्रास देऊ नये, गाई गुरांना अभय मिळावे,संरक्षण मिळावे यासाठी वाघदेवाला कोंबडे, बकरे श्रद्धेपोटी अर्पण करतात. कुणी लाकडाचा, कोणी दगडाचा तर कोणी कणकीचा वाघ करून त्याची पूजा करतात. त्याच्या जोडीला त्याच्या सारख्याच पण लहान आकारच्या मूर्ती कोरलेल्या असतात त्यांना सहकारी शिपाई (चहोटा) म्हणतात.


आम्हाला आमच्या जंगलात सुखाने नांदू दे ! अशी प्रार्थना प्रत्येकजण वाघोबाला करतो. वाघबारशीच्या दिवशी वाघ बसवलेल्या ठिकाणी जाऊन त्याच्या समोर पणती लावतात.नारळ फोडून व वाहून पूजा करतात आणि वाघोबाच्या पाया पडून आराधना केली जाते. आमचे, गुराख्यांचे, गाई-गुरांचे रक्षण कर. शेतात चांगले पीक दे, आजारांना दूर ठेव. असा सुकेसर (सुकदेव/सुखदेव) केला जातो. माणसांसारखीच शिकार करणारा जंगलातील सर्वशक्तिमान प्राणी वाघ आहे. त्याच्या सामर्थ्याने दिपून जाऊन त्याची पूजा सुरू केली. 


आदिवासींच्या जीवनातील पावन दिवस म्हणजे "वाघबारस" हा दिवस आश्विन महिन्यात काळोखात येतो. हा दिवस पावन असण्याचे आणखी एक कारण रवाळ या आदिवासी शिक्षणाचे समापन याच दिवशी काही भागात असते. याच दिवशी चार महिन्यानंतर वनस्पतीजन्य औषधी भगत परिपूर्ण तयार करतो. म्हणूनच आदिवासींच्या जीवनात वाघबारस या दिवसाचे विशेष महत्व आहे. "रवाळ" म्हणजे आदिवासींमध्ये पूर्वीपासून सुरु असलेले सात दिवसांचे प्रशिक्षण होय. या प्रशिक्षणामध्ये डोंगराच्या औषधीची ओळख व भगत खंड यांचे प्रशिक्षण दिले जाते. रवाळ ही दस­-याच्या दिवसापासून सुरु होते आणि वाघबारस या दिवशी रवाळ समापन केली जाते.


 दस­-याच्या दिवशी आपल्या पाड्यापासून दूर डोंगरातील ओहळ किंवा पाणवठ्याची जागा निवडून पडाळ,कोप (झोपडी) तयार करून रात्रीच्या वेळी भगत साधारण आपल्या चेल्यांना सोळा रात्री प्रशिक्षण देतो. वाघबारशीच्या अगोदरच्या रात्री व वाघबारशीच्या दिवशी विशेष रित केली जाते. काही नवीन भगताचे प्रशिक्षण पावसाळा सुरु झाल्यापासून होते. त्यांचा वाघबारशीपर्यंतचा प्रशिक्षण कालावधी साधारण चार महिन्यांचा असतो. या प्रशिक्षणामध्ये आदिवासी संस्कार व आदिवासी तत्त्वज्ञान असलेले पुढील खंड शिकविले जातात.


1. महादेव खंड-मनुष्य निर्मितीची कथा

2. पालीचा खंड-शारीरिक दुखापतीबद्दल

3. बायांचा खंड-महिलांसाठी कथा

4. मुठीचा खंड-शरीरावरील आघातासारख्या आजारासंदर्भात

5. कणसरी खंड-धान्य देवतेची संस्कार कथा व महत्त्व याशिवाय पुढील दोन खंड जे प्रशिक्षणास अनिवार्य नाहीत.

6. दिस खंड-दिवसकार्य संदर्भात कथा व रीत

7. जात खंड-पाप निवारणसंदर्भात रीत व तत्त्व


या खंडाचा शब्द न शब्द लक्षात ठेवावयाचा असतो. त्यामुळे ज्याची स्मरणशक्ती चांगली तोच भगत बनू शकतो. हे प्रशिक्षण पूर्णपणे तोंडी अभ्यासावर अवलंबून असते. वाघबारशीच्या अगोदरच्या रात्री व वाघबारशीच्या दिवशी तारपकरी देवांचे चाळे लावतो आणि भगत लोक वेगवेगळ्या देवांचे वारे घेतात. घोळ काठीच्या आवाजाने अधिक उत्साह निर्माण केला जातो. यावेळी मखोलीची (झेंडू) फुले देवांना वाहिली जातात. त्यानंतरच म्हणजेच वाघबारशीपासून आदिवासी महिला ही फुले आपल्या केसात व गजरात लावायला सुरुवात करतात. खरंतर योग्य वेळच्या अगोदर कोवळी, अपरिपक्व फुले तोडू नये म्हणून वाघबारशी नंतर ही पक्व फुले तोडावीत हा मिळालेला आदिवासी संस्कार खूपच निसर्गप्रेमी आहे. 


वाघ हा कोकणांप्रमाणेच भिल्ल, वारली, कोळी महादेव व ठाकर जमातींमध्येही कुलदेवक आहे.माझे आडनावाचे पण वाघोबा हे कुलदैवत आहे परंतु देव म्हणून आदिवासी त्याला सर्वत्र पूजतात. वाघदेवाच्या दगडी मूर्ती नाशिक कळवण व सुरगाणा,इगतपुरी व अ,नगर मधील अकोले तालुक्यात आदिवासी भागात दिसतात. वाघोबाच्या लाकडी मूर्ती मात्र सर्वत्र आहेत. प्रत्येक गावात वाघोबाचे ठाणक (ठाणे) असते. 


वाघोबाची लाकडी मूर्ती सपाट आकाराची असते. त्यावर वरच्या भागी सूर्यदेव, चंद्रदेव, वाघदेव, नाग, विंचू व मोर हे सर्वसाक्षी देव म्हणून कोरलेले असतात. मधल्या भागात शेपूट उंचावलेला वाघ आणि खाली साप आणि विंचू कोरलेले असतात. वाघदेवाचे स्थान गावदेवीजवळ आहे परंतु तो तिथे न राहता गाव सीमेवर राहतो. वाघदेव गावदेवीच्या ताब्यात, तिच्या पायाशी त्याचे स्थान आहे. जंगलातील वाघांचे व तत्सम हिंरुा प्राण्यांचे हे प्रतीक आहे. त्याला गावदेवीच्या ताब्यात दिल्याने जंगलातील वाघांचा अथवा हिंस्त्र पशूंचा गावक­ऱ्यांना त्रास होत नाही. गावदेवी त्यांच्यावर लक्ष ठेवते.असा विश्वास असतो. 


 क्वचित एखादा वाघ जंगलातून गावात शिरला, त्याने पाळीव प्राण्यांना दगा दिल्यास गावदेवीला नारळ वाढला जातो. वाघदेवाच्या पूजेने जनावरांचे रक्षण होते असे मानले जाते. आपल्या जनावरांच्या व इतर गोष्टीपासून संरक्षण व्हावे म्हणून जंगलातील वाघाची पूजा केल्यानंतर हा त्रास होणार नाही त्याला बोकड व कोंबडे, नारळ आदि नैवेद्य दाखवितात. त्याची प्रतिष्ठापना गावाबाहेर वेशीवर गावाच्या सीमेवर किंवा मोठ्या जूनाट वृक्षाखाली करतात. हिंस्त्र पशूंपासून आपले व आपल्या पाळीव प्राण्यांचे संरक्षण करणारा आहे असे मानून त्याची आदिवासी पूजा करतात. 


दिवाळीच्या तीन दिवस अगोदर वसुबारस वा वाघबारस येते. गावांच्या शिवाराच्या सरहद्दीवर असलेल्या वाघदेवांच्या नावाने गेल्या शेकडो वर्षापासून भव्य अशी यात्राच भरते. वसुबारस म्हणजे आदिवासींच्या वाघबारसीच्या दिवशी गुरे चारणारे गुराखी (बाळादी) नेहमीप्रमाणे गायी चारण्यासाठी जंगलात जातात. या दिवशी सर्व गुराखी उपवास करतात, दुपारी या गावातील भगत व ग्रामस्थ गावाच्या सीमेवर असलेल्या वाघदेवाजवळ जमा होतात. आदिवासी पंरपरेनुसार प्रत्येक गावाच्या सीमेवर वाघदेवाच्या मूर्तीची लाकूड, दगडावर तथा चिऱ्यावर स्थापना केलेली आढळते. याला वाघदेवाची पाटली किंवा चिरा असे संबोधले जाते. या वाघदेवाच्या पाटलीवर, चि­ऱ्यांवर चित्रे कोरली असतात.


वाघदेवाला या दिवशी प्रथम शेंदूर लावला जातो.शेतातील नवीन पीक म्हणजे नागली (कणसरी), उडीद व तांदूळ आदि पिकांची कणसे वाहिली जातात. गावाच्या प्रथेनुसार भगतामार्फत तांदूळ, उडिदाचा पूंजका टाकून पूजाअर्चा केली जाते. येथे जंगलातील रानभूत, डोंगरदेव, निळादेव, हिरवादेव, कणसरी, रानवा, गावदेवी व गाई या सर्वांची विधिवत पूजा केली जाते. 


वाघदेव सीमेवरील संपूर्ण पूजाअर्चा आटोपल्यानंतर वाघेदवाच्या नावाने भरविल्या जाणा­या वाघबारशाच्या यात्रेस प्रारंभ होतो. हे ठिकाण जंगलात व डोंगरात असल्याने या यात्रेला नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे यात्रेसाठी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव आवर्जून उपस्थित राहतात. या यात्रेत सर्व पाळीव जनावरांना एकत्रित करून सर्व उपवासी गुराखी पाच प्रदर्क्षिणा करून गुरांना घरी घेऊन जातात. तोपर्यत गोरज काळ येतो नंतर एका ठिकाणी नैवैद्याचा स्वयंपाक करून सर्व गुराख्यांचा उपवास सोडवला जातो.


आदिवासी बांधवांची दिवाळी ही वाघदेवाच्या पूजनाने सुरु होते. वाघबारशीच्या निमित्ताने गावसीमेवर गावोगावी पूजा होते. आदिवासी निसर्गपूजक आहे. निसर्ग हाच मानव जातीचा तारणहार आहे. आदिवासींची शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. जल, जंगल, जमीन यावर आदिवासी समुदाय पिढ्यांपिढ्या हक्क सांगत आला आहे. त्यामुळे आदिवासींच्या जीवनातील पावन दिवस म्हणजे वाघबारस ही हिंदू धर्मापेक्षा आदिवासी समुदायात वेगळ्या त­हेने साजरी केली जाते. 


दिवाळी म्हटली की नवीन कपड्यांची खरेदी, गोडधोड पदार्थ, गायत्री पूजा, दिवा लावणे पण आदिवासी बांधवांत हाच सण परंपरेनुसार जरा वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची पद्धत आजही कायम आहे. आदिवासी संपत्ती संचयाला फारसे महत्त्व देत नाही. मिळेल तेवढ्यात समाधान मानून आपले जीवन आनंदात जगत असतो. त्यामुळे संपत्ती म्हणजे धान्य आणि गावतरी गाय/गावडी (पशू) पूजन हेच महत्त्वाचे मानतो.


गावातील भगताकरवी, जाणकार व्यक्ती सीमेवर एकत्र येतात, प्रत्येक घरोघरी जाऊन शेरभर तांदूळ जमा करतात. त्याला "इरा" असे म्हणतात. संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास काटे सावरीचा खांब गायदांडावर उभा करून त्या जागी शेणाने सारवून तांदळाच्या पुंजक्या पाडतात. आदिवासी बांधव स्वाभाविकत: स्वस्तिक वगैरे काढत नाहीत. शेंदूर चढवून पूजा केली जाते. वाघदेवाला भगताकडून विनवणी केली जाते. यावर्षी आमच्या गावतरीचे रक्षण केलेस तसेच पुढे पण करत रहा, अशी विनवणी वाघदेव, नागदेव, सूर्य, चंद्र, मोर, पानदेव व रानदेव यांना केली जाते. त्या ठिकाणी अंडी किंवा कोंबडीचे जीवंत पिल्लू ठेवून गायदांडावरून ढोल वाजवून गाई हाकलत गुरांना भडकावून पळविले जाते. कळप सैरावैरा पळतो अन् कळपाच्या पायाखाली अंडे किंवा पिल्लू तुडवून बळी दिला जातो. मंतरलेले गोमूत्र, पाणी व तांदळाचे दाणे गुरांच्या गोठ्यात शिंपडण्यासाठी घरोघरी दिले जाते व गोठा पवित्र केला जातो. नंतर गुराख्यांचा उपवास सोडविला जातो. त्यांनी संकलन केलेल्या तांदुळाचा नैवैद्य बनवून जेवण दिले जाते. 


तात्पर्य :-


आदिवासी समाज हा निसर्गपूजक आहे निसर्ग हाच मानव जातीचा तारणहार आहे.हे त्रिकालाबाधित वैज्ञानिक सत्य आहे. आदिवासींची शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. जल, जंगल, जमीन यावर आदिवासी समुदाय पिढ्यांपिढ्या हक्क सांगत आला आहे. त्यामुळे आदिवासींच्या जीवनातील पावन दिवस म्हणजे वाघबारस ही हिंदू धर्मापेक्षा आदिवासी समुदायात वेगळ्या त-हेने साजरी केली जाते. या सणाला दिवाळी निसर्गाची मनोभावे पूजा करुन निसर्ग प्रसन्न होतो अशी आदिवासीची भावना असते.



संकलीत लेख-डॉ पी डी गांडाळ, नाशिक.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.