चांदसैली येथे आदिवासी पावरा- बारेला समाजाचे महासंमेलन संपन्न.! Adivasi Pawara Barela Mahasamelan
Adivasi TV India: दिनांक २५ डिसेंबर २०२३ रोजी आदिवासी पावरा-बारेला समाजातील रिती-रिवाज, रूढी-परंपरा, संस्कृती यांचे संरक्षण व संवर्धन करीत असताना सामाजिक विकास कसा साधता येईल यावर विचार मंथन करण्यासाठी शहादा तालुक्यातील चांदसैली या गावी अखिल भारतीय आदिवासी पावरा-बारेला समाज मंडळामार्फत संमेलन आयोजित करण्यात आले.
संमेलनात मध्य प्रदेशातील बडवाणी, खरगोन जिल्ह्यातील व महाराष्ट्र राज्यातून चोपडा, शिरपूर, शहादा, धडगांव, तळोदा तालुक्यातील ३०० पेक्षा अधिक गावातील गाव पटेल,गाव पुजारा तसेच ग्राम समितीचे पाच हजाराहुन अधिक पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता. या संमेलनाचे अध्यक्ष समाजातील ज्येष्ठ पोलीस पाटील मा.शिलेदार डूडवे, करणपुरा (म. प्र.) हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अखिल भारतीय आदिवासी पावरा-बारेला समाज मंडळाचे अध्यक्ष मा. नामदेव पटले यांनी केले. या प्रसंगी मंडळाने प्रसिध्द केलेल्या संकल्प पत्रावर प्रत्येक गाव समितीने ठराव पारीत करुन आणले. संबंधीत ठरावांवर विचार मंथन करुन खर्चिक कार्यक्रमांवर प्रतिबंध आणणे,लग्न विधी, मयत विधी व इतर विविध सामाजिक उत्सव, कार्यक्रम, मानता, इंदल पूजा, सिकल सेल आजार तसेच वधू पक्षाला दिली जाणारी देजा रक्कम व सामूहिक कार्यक्रमात दारूच्या वापरावर संपूर्ण प्रतिबंंध आणणे, बालविवाहास प्रतिबंध घालणे यावर सर्व समावेशक अशी नियमावली तयार करण्यात आली व सर्व संमतीने मंजूर करुन घोषित करण्यात आली. नियमावलीचे वाचन अखिल भारतीय आदिवासी पावरा-बारेला समाज मंडळाचे अध्यक्ष नामदेव पटले यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी शेती, शिक्षण, व्यवसाय तसेच युवा पिढी यावर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले.
या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना मा. अजय खर्डे, उपायुक्त यांनी नवीन बदल स्वीकारत असताना संस्कृती संवर्धन सोबत शैक्षणिक विकासाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे नमूद केले. तसेच मा.धनसिंग पावरा, धडगाव नगर परिषद अध्यक्ष व धडगाव तालुका पावरा समाज मंडळाचे अध्यक्ष म्हणुन त्यांनी धडगाव तालुक्यात पावरा समाजाने पारीत केलेले ठरावाचे वाचन केले. मा.गजानन ब्राम्हणे यांनी मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील समाजाचे सामाजिक व्यवहार एक व्हावे यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे गरज असल्याचे सांगत आदिवासींपुढील विविध समस्यांचा ऊहापोह केला.
या प्रसंगी माजी आमदार मा.ग्यारसीलाल रावत, सुश्री चंद्रभागा किराडे, सौ.रंजना पावरा, मंडळाचे संचालक सुरेश मोरे, जेलसिंग पावरा, महासचिव मेहरबान बर्डे, सायसिंग भंडारी, श्याम वास्कले, गोपाल भंडारी, रामकिसन जाधव, सत्तरसिंग आप्पा, डॉ.हिरा पावरा, डॉ.विजय पवार, डॉ.जितेंद्र भंडारी, डॉ.चंद्रकांत बारेला, अस्तरदादा मोते, ऊज्जैनदादा बरडे , उपजिल्हाअधिकारी डॉ.अर्जून पावरा तसेच मंडळाचे तालूकास्तरीय पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी ,अधिकारी गावातील सरपंच सौ.मनिषा पटले, पोलीस पाटिल सौ.विजया चव्हाण परिसरातील गावकरी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समारोप छोटुलाल खर्डे यांनी केले. चांदसैली ग्रामस्थांचे शिस्तबद्ध नियोजन आणि परिश्रमामुळे संमेलन यशस्वीरित्या संपन्न झाले.