बोराडी: कठडे नसलेल्या पुलावरुन कार कोसळली; चौघे जखमी
बोराडी : शिरपूर तालुक्यातील बोराडी-पानसेमल रस्त्यावर असलेल्या कामगार कारखान्याच्या वळणावरील कठडे नसलेल्या पुलावरुन स्विफ्ट डिझायर कार कोसळून चौघे जखमी झाल्याची घटना घडली आहे. सदर घटना दि. २६ तारखेला दुपारी ४-५ विजेच्या दरम्यान घडली. जखमींमध्ये चालक, दोन मुले, एका महिलेचा समावेश आहे. जखमींना प्राथमिक उपचारासाठी शिरपूर येथील इंदिरा मेमोरियल रुग्णालयात व तेथून खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरातील कठडे नसलेल्या पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शिरपूर तालुक्यातील बोराडीहून पानसेमल (मध्य प्रदेश) कडे जाणाऱ्या रस्त्यावरील लेंड्या नाल्यावरील पुलावरून स्विफ्ट डिझायर कार (एमएच ३९/जे-२९७२) चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार पुलाखाली कोसळली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला तर कार चालक कलिम इब्राहिम खाटीक (४५), लकी कलीम खाटीक (१२), माहिल कलिम खाटीक (१२) व एक महिला (नाव माहित नाही) सर्व रा. शहादा, हे चौघे जखमी झाले. ते कारने बोराडीमार्गे शहाद्याकडे जात असताना ही घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींना प्रथम शिरपूर येथील इंदिरा मेमोरियल रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रथमोपचारानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, बोराडी परिसरात बहुतेक पुलांना संरक्षण कठडे नाहीत. कठड्याअभावी पुलांवर लहान-मोठ्या अपघाताच्या घटना घडतात. कामगार कारखान्याच्या वळणावर असलेल्या लेंड्या नाल्यावरील पुलाला देखील संरक्षण कठडे नाहीत. यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.