Hot Widget

Type Here to Get Search Results !

हिवाळी अधिवेशनात एकुण 24 विधेयके मंजूर |ऐतिहासिक शक्ती विधेयकासह अधिवेशनात 24 विधेयके मंजूर – उपमुख्यमंत्री अजित पवार

हिवाळी अधिवेशनात एकुण 24 विधेयके मंजूर |ऐतिहासिक शक्ती विधेयकासह अधिवेशनात 24 विधेयके मंजूर – उपमुख्यमंत्री अजित पवार

हिवाळी अधिवेशनात ऐतिहासिक शक्ती विधेयकासह अधिवेशनात 24 विधेयके मंजूर – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात 24 विधेयके संमत करण्यात आली. यामध्ये ऐतिहासिक अशा शक्ती विधेयकाचा समावेश आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले.

महाराष्ट्र विधिमंडळाचे २०२१ चे हिवाळी अधिवेशन संस्थगित झाले. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, संसदीय कार्य मंत्री अनिल परब, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे उपस्थित होते.

श्री.पवार यांनी सांगितले, या अधिवेशनात एकूण 24 विधेयके दोन्ही सभागृहात मंजूर झाली. एक विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्याचा निर्णय झाला. तीन विधेयके मागे घेण्यात आली. या अधिवेशनात मंजूर करण्यात आलेली सगळीच विधेयके महत्वाची होती. या विधेयकांपैकी शक्ती विधेयक हे ऐतिहासिक म्हणावं लागेल. या कायद्यामुळे राज्यातील माता-भगिनींची तसेच लहान मुलांची सुरक्षितता आपण निश्चित केली आहे. राज्यातल्या महिलाशक्तीला बळ देत असताना, पुरुष वर्गावरही विनाकारण अन्याय होणार नाही, याचा समतोल साधण्याचा प्रयत्न आपण शक्ती विधेयकात केला आहे, असे श्री.पवार यांनी सांगितले.

अधिवेशनात तीन कृषी विधेयके एकमताने मागे घेण्यात आली. अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये शिक्षकांच्या पदांना संवर्गनिहाय आरक्षण लागू करण्याचे विधेयक देखील महत्वपूर्ण आहे. अधिवेशनात ३१ हजार २९८ कोटी  २६ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्यात येऊ नये, असा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. तशी शिफारस निवडणूक आयोगाला करण्यात येत आहे. ओबीसी बांधवांच्या राजकीय आरक्षण निश्चितीसाठी, महत्वाचा असलेला इम्पिरीकल डेटा संकलित करण्यासाठी, पुरवणी मागण्यांद्वारे ४३५ कोटी रुपये मंजूर केले, असे श्री.पवार यांनी सांगितले.

छत्रपती संभाजी महाराजांचे, तुळापूर येथील स्मृतीस्थळ, वढू बुद्रुक येथील स्मारक आणि परिसराचा विकास करण्यात येणार आहे. स्मारक परिसराच्या विकासासाठी १५० कोटी रुपये टप्प्याटप्प्यानं खर्च करणार आहोत. छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी छत्रपती सईबाई महाराज यांच्या राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या समाधीस्थळ परिसराचाही विकास करण्याचाही निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्राचा अभिमान आणि अस्मिता असलेल्या ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही श्री.पवार यांनी सांगितले.

विदर्भ आणि मराठवाड्याच्या निधी वाटपात अन्याय केलेला नाही. वैधानिक मंडळाच्या निकषानुसारच निधीचे वितरण झाले आहे. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी पिक विम्याला पर्याय शोधण्यात येत आहे, अशी माहिती श्री.पवार यांनी दिली.

गेल्या सहा दिवसांत, राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या तिपटीनं वाढली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये रुग्णांची संख्या वाढण्याची भीती, आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. त्याकडेही सर्वांनी गांभीर्यानं बघितलं पाहिजे. राज्यात आणि देशात कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, सर्वांनी मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सामाजिक अंतर राखणे या नियमांचे पालन करावे, असे आवाहन श्री.पवार यांनी केले.

सन 2021 चे राज्य विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन

प्रस्तावित शासकीय विधेयकांची दिनांक 28.12.2021 यादी

प्रलंबित विधेयके0  नवीन पुर:स्थापीत/ पुर:स्थापनार्थ विधेयके एकूण: 28 दोन्ही सभागृहात संमत विधेयके24  संयुक्त समितीकडे पाठविलेली विधेयके1  विधान सभेत प्रलंबित विधेयके   विधान परिषदेत प्रलंबित विधेयके   मागे घेण्यात आलेली विधेयके 3  एकूण विधेयके 28 .

दोन्ही सभागृहात संमत विधेयके

  • सन 2020 चे विधानसभा विधेयक क्र. 51 - शक्ति फौजदारी कायदा (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2020, (महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या अनुषंगाने भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 व मुलांचे लैगिक गुन्ह्यांपासून प्रतिबंध अधिनियम, 2012 यामधील तरतूदींमध्ये सुधारणा करणे, नविन कलामांचा समावेश करणे, शिक्षेत वाढ करणे (गृह विभाग) (पुर:स्थापित दि. 14.12.2020, संयुक्त समितीकडे पाठविण्याचा ठराव संमत दि. 15.12.2020, संयुक्त समितीचा अहवाल सादर करण्यासाठी निश्चित केलेला कालावधी वाढविण्यासंबंधीचा ठराव दि. 08.03.2021, संयुक्त समितीचा ठराव सादर 22.12.2021) (विधानसभेत संमत 23.12.2021, विधानपरिषदेत समंत दि. 24.12.2021).
  • सन 2021 चे विधानसभा विधेयक क्र. 23.- महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) विधेयक, 2021 (सन २०२1 चा महा. अध्या. क्र. 3). ‍ (इतर मागास वर्ग २७ % पर्यंत आरक्षण) (ग्रामविकास विभाग) (पुर:स्थापित दि. 22.12.2021) (विधानसभेत संमत दि. 12.2021, विधानपरिषदेत समंत दि. 24.12.2021).
  • सन 2021 चे विधानसभा विधेयक क्र. 21.- महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, 2021 (सन २०२1 चा महा. अध्या. क्र. 4) (नगरविकास विभाग) ‍(Multi Member Ward) (पुर:स्थापित दि. 22.12.2021) (विधानसभेत संमत दि. 12.2021, विधानपरिषदेत समंत दि. 24.12.2021).
  • सन 2021 चे विधानपरिषद विधेयक क्र. 3.- महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (दुसरी सुधारणा) विधेयक, 2021 (सन २०२1 चा महा. अध्या. क्र. 14)  (जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्यास मुदत देणे) (ग्रामविकास विभाग) (पुर:स्थापित दि. 22.12.2021) (विधानपरिषदेत संमत दि. 12.2021 विधानसभेत संमत दि. 24.12.2021).
  • सन 2021 चे विधानपरिषद विधेयक क्र. 4.- मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (दुसरी सुधारणा) विधेयक, 2021. (सन २०२1 चा महा. अध्या. क्र. 15) (जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्यास मुदत देणे) (नगरविकास विभाग) (पुर:स्थापित दि. 22.12.2021) (विधानपरिषदेत संमत दि.12.2021 विधानसभेत विचारार्थ दि. 24.12.2021).
  • सन 2021 चे विधानसभा विधेयक क्र.- महाराष्ट्र (तृतीय पुरवणी) विनियोजन विधेयक, 2021 (पुर:स्थापनार्थ व विचारार्थ दि. 27.12.2021) (विधानसभेत संमत दि. 27.12.2021) (विधानपरिषदेत संमत दि. 27.12.2021)
  • सन 2021 चे विधानसभा विधेयक क्र. 20.- मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, 2021 (सन २०२1 चा महा. अध्या. क्र. 6) (नगरविकास विभाग) (इतर मागास वर्ग २७ % पर्यंत आरक्षण) (पुर:स्थापित दि. 22.12.2021) (विधानसभेत विचारार्थ दि. 23.12.2021, विधानपरिषदेत संमत दि. 27.12.2021).
  • सन 2021 चे विधानसभा विधेयक क्र. 41.- महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (अध्यापक संवर्गातील आरक्षण) विधेयक, 2021 (पुर:स्थापनार्थ, विचारार्थ व संमत दि. 28.12.2021).
  • सन 2021 चे विधानसभा विधेयक क्र. 22.- महाराष्ट्र नगरपरिषदा व नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, 2021 (सन २०२1 चा महा. अध्या. क्र. 5). ‍(नगरविकास विभाग) (Multi Member Ward) (पुर:स्थापित दि. 22.12.2021) (विधानसभेत विचारार्थ दि. 23.12.2021, 24.12.2021, 27.12.2021) (विधानसभेत संमत 27.12.2021) (विधानपरिषदेत संमत दि. 12.2021).
  • सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक. 37. - महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा) विधेयक 2021 (अनुक्रमे ६, 33, 40, 41 व 54 यात मुद्रांक शुल्कात सुधारणा करण्याकरिता) (महसूल विभाग) (पुर: स्थापित दि. 23.12.2021, विधानसभेत विचारार्थ दि. 27.12.2021) (विधानसभेत संमत 27.12.2021) (विधानपरिषदेत संमत दि. 28.12.2021).
  • सन 2021 चे विधानसभा विधेयक क्र. 38.-महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा व विधिग्राह्यीकरण) विधेयक, 2021 (The Sick Industrial Companies (Special Provisions) Act 1985 मधील कलमे 18 व 19 अन्वये The Board for Industrial and Financial Reconstruction (BIFR)  यांनी तसेच, Insolvency and Bankruptcy Code, 2016 मधील कलम 31 अन्वये राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरण यांनी पारित केलेले आदेश यांवर मुद्रांक शुल्क भुतलक्षी प्रभावाने बसविणे व वसूल करण्याकरिता महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम याचे कलम 2(g) व अनुसूची (1) मधील अनुच्छेद 25 (da) मध्ये सुधारणा) (महसूल विभाग) (पुर:स्थापित दि. 23.12.2021, विधानसभेत विचारार्थ दि.27.12.2021) (विधानसभेत संमत दि. 27.12.2021) (विधानपरिषदेत संमत दि. 28.12.2021).
  • सन 2021 चे विधानसभा विधेयक क्र. 26.- महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (दुसरी सुधारणा) विधेयक, 2021 (सन २०२1 चा महा. अध्या. क्र. 8) (नवीन महाविद्यालय, नवीन पाठयक्रम, विषय विद्याशाखा सुरू करण्याकरीता नवीन वेळापत्रक विनिर्दिष्ट करणे) (पुर:स्थापित दि. 22.12.2021) (विधानसभेत विचारार्थ दि. 23.12.2021, 24.12.2021, 27.12.2021) (विधानसभेत संमत दि. 27.12.2021) (विधानपरिषदेत संमत दि. 12.2021).
  • सन 2021 चे विधानसभा विधेयक क्र. 29.- महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (सुधारणा) विधेयक, 2021 (सन २०२1 चा महा. अध्या. क्र. 2) ‍(नवीन संस्था, नवीन पाठ्यक्रम, तुकड्या सुरू करण्यासाठी व संस्था बंद करण्यासाठीच्या कार्यपद्धतीचे नवीन वेळापत्रक विनिर्दिष्ट करणे) (पुर:स्थापित दि. 22.12.2021) (विधानसभेत विचारार्थ दि. 23.12.2021, 24.12.2021, 27.12.2021) (विधानसभेत संमत दि. 27.12.2021) (विधानपरिषदेत संमत दि. 12.2021).
  • सन 2021 चे विधानसभा विधेयक क्र. 28.- महाराष्ट्र महानगरपालिका व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती आणि औद्योगिक नगरी (दुसरी सुधारणा) विधेयक, 2021 (महानगरपालीका व नगरपरिषदा यांच्या निर्वाचित सदस्य संख्येत वाढ) (सन २०२1 चा महा. अध्या. क्र. 10) (नगरविकास विभाग) (नगरविकास विभाग) (पुर:स्थापित दि. 22.12.2021) (विधानसभेत विचारार्थ दि. 23.12.2021, 24.12.2021, 27.12.2021, विधानसभेत संमत दि. 28.12.2021) (विधानपरिषदेत संमत दि. 28.12.2021).
  • सन 2021 चे विधानसभा विधेयक क्र.27.- मुंबई महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, 2021 (भांडवली मूल्य सुधारीत करण्यास सन 2021-22 करीता सवलत देणेबाबत) (सन २०२1 चा महा. अध्या. क्र. 11) (नगरविकास विभाग) (पुर:स्थापित दि. 22.12.2021) (विधानसभेत विचारार्थ दि. 23.12.2021, 24.12.2021, 27.12.2021, 28.12.2021 विधानसभेत संमत दि. 28.12.2021) (विधानपरिषदेत संमत दि. 28.12.2021).
  • सन 2021 चे विधानसभा विधेयक क्र. 24.- महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) विधेयक, 2021(सन २०२1 चा महा. अध्या. क्र. 7) (सहकारी संस्थांनी करार निविष्ट कालावधीत त्यांच्या नफ्याचा विनियोग करणे, त्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे आणि लेखा परिक्षण वित्तीय करणे इ. बाबींकरीता वर्ष 2021-22 साठी तरतूद लागू करण्याबाबत) (सहकार, वस्त्रोद्योग व पणन विभाग) (पुर:स्थापित दि. 22.12.2021) (विधानसभेत विचारार्थ दि. 12.2021, 24.12.2021, 27.12.2021, दि. 28.12.2021) (विधानसभेत संमत दि. 28.12.2021) (विधानपरिषदेत संमत दि. 28.12.2021).
  • सन 2021 चे विधानसभा विधेयक क्र. 25.- महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा व विधिग्राह्यीकरण) विधेयक, 2021 (सहकार, वस्त्रद्योग व पणन विभाग) (ज्या सहकारी संस्थांच्या समितीच्या सदस्यांचा व पदाधिकाऱ्यांचा कालावधी १० जुलै २०२१ पूर्वी समाप्त झाला असेल त्यांना नवीन समिती यथोचितरित्या घटित होईपर्यंत सदस्य म्हणून संरक्षण मिळवण्यासाठी विधेयक) (सन २०२1 चा महा. अध्या. क्र. 9) (सहकार, वस्त्रोद्योग व पणन विभाग) (पुर:स्थापित दि. 22.12.2021) (विधानसभेत विचारार्थ दि. 12.2021, 24.12.2021, संमत दि. 28.12.2021) (विधानपरिषदेत संमत दि. 28.12.2021).
  • सन 2021 चे विधानपरिषद विधेयक क्र. 5.- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) विधेयक, 2021 (जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य संख्या वाढविणेबाबत) (ग्रामविकास विभाग) (पुर:स्थापित दि. 22.12.2021) (विधानपरिषदेत संमत दि. 12.2021 विधानसभेत विचारार्थ दि.24.12.2021, 27.12.2021, दि. 28.12.2021, ) (विधानसभेत संमत दि. 28.12.2021).
  • सन 2021 चे विधानपरिषद विधेयक क्र. 6.- महाराष्ट्र राज्य कौशल्य व व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळ विधेयक, 2021 (कौशल्य व व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळ स्थापन करणेबाबत) (पुर:स्थापित दि. 22.12.2021) (विधानपरिषदेत संमत दि. 12.2021 विधानसभेत विचारार्थ दि. 24.12.2021, 27.12.2021, दि. 28.12.2021) (विधानसभेत संमत दि. 28.12.2021).
  • सन 2021 चे विधानसभा विधेयक क्र. 39.- महाराष्ट्र सहकारी संस्था (तिसरी सुधारणा) विधेयक, 2021 (सहकार, वस्त्रद्योग व पणन विभाग) (97 व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने युनियन ऑफ इंडिया विरुध्द राजेंद्र शहा व इतर या केसमध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार सहकारी संस्थांच्या सदस्यांच्या हितार्थ आणि सहकार चळवळीच्या सुरळीत कामकाजारीता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 मध्ये कलम 25अ, 26, 73अअअ, 73कअ, 75, 78, 78अ, 79, 82, 109, 144-5अ, 157) (पुर:स्थापित दि. 24.12.2021, विधानसभेत विचारार्थ दि.27.12.2021, 28.12.2021, विधानसभेत संमत दि. 28.12.2021, विधानपरिषदेत संमत दि. 28.12.2021).
  • सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक. 36.- महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (सुधारणा) विधेयक, 2021 (पिककर्ज वाटप करणाऱ्या बहुउद्देशिय सहकारी संस्थांच्या मतदानाच्या अधिकाराबाबत) (सहकार, वस्त्रोद्योग व पणन विभाग) (पुर: स्थापित दि. 23.12.2021, विचारार्थ दि. 27.12.2021, विधानसभेत संमत दि. 28.12.2021, विधानपरिषदेत संमत दि. 28.12.2021).
  • सन 2021 चे विधानसभा विधेयक क्र. 33. - मुंबई महानगरपालिका (दुसरी सुधारणा) विधेयक, 2021 (नगर विकास) (बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील सदस्यांच्या संख्येत वाढ करणेबाबत) (सन २०२1 चा महा. अध्या. क्र. 13) (नगरविकास विभाग) (पुर:स्थापित दि. 22.12.2021) (विधानसभेत विचारार्थ दि. 12.2021, 24.12.2021, 27.12.2021, 28.12.2021, विधानसभेत संमत दि. 28.12.2021, विधानपरिषदेत संमत दि. 28.12.2021).
  • सन 2021 चे विधानसभा विधेयक क्र. 31.-महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन (सुधारणा) विधेयक, 2021 (अभिनिर्णय अधिकारी, अपराधांची दखल घेणेबाबत तरतुदी इ.बाबत सुधारणा करणे) (सन २०२1 चा महा. अध्या. क्र. 12) (पुर:स्थापित दि. 22.12.2021) (विधानसभेत विचारार्थ दि. 12.2021, 24.12.2021, 27.12.2021, दि. 28.12.2021, विधानपरिषदेत संमत दि. 28.12.2021).
  • सन 2021 चे विधानसभा विधेयक क्र. 35.-महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (तिसरी सुधारणा) विधेयक, 2021 (प्रकुलपतींची तरतूद करण्यासंदर्भात सुधारणा) (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) (पुर: स्थापित दि. 23.12.2021, 27.12.2021, दि. 28.12.2021).

संयुक्त समितीकडे पाठविलेली विधेयके

  • सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रीडा. 52 - महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालये (शक्ति कायद्याखालील महिलांच्या व बालकांच्या विरूध्दच्या विवक्षित अपराधांसाठी) विधेयक, 2020 (गुन्ह्यास आळा घालणे आणि गुन्ह्यातील तपास जलद गतीने करण्यासाठी विशेष पोलीस पथके निर्माण करणे, अशा प्रकरणांसाठी स्वतंत्र अनन्यसाधरण न्यायालये निर्माण करून ३० कामकाज दिवसांच्या कालावधीत प्रकरणे निकाली काढण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे) (गृह विभाग) (पुर:स्थापित दि. 14.12.2020, विधानसभेत विचारार्थ दि. 15.12.2020, 23.12.2021).

मागे घेण्यात आलेली विधेयके

  • सन 2021 चे महाराष्ट्र विधान सभा विधेयक क्र. - शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण) किंमत आश्वासन व कृषी सेवा करार (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, २०२१ (कृषि,पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स व्यवसाय विभाग) (शेतकऱ्यांच्या हिताचे प्रभावीपणे संरक्षण करण्यासाठी, शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण) आश्वासित मूल्य व कृषि सेवा करार अधिनियम, 2020, हा केंद्रिय अधिनियम महाराष्ट्र राज्यास लागू असतांना त्यात सुधारणा करण्याकरीता विधेयक) (पुर:स्थापित दि. 06.07.2021, विधानसभेत विचारार्थ दि. 06.07.2021) (मागे घेण्याचा ठराव दि. 23.12.2021).
  • सन 2021 चे महाराष्ट्र विधान सभा विधेयक क्र. - शेतकरी उत्पन्न व्यापार व वाणिज्य (प्रचालन व सुलभीकरण) (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, २०२१ (सहकार, वस्त्रोद्योग व पणन विभाग) (शेतकऱ्याला वेळेच्या आत त्याच्या कृषि उत्पन्नाची किंमत मिळेल याची खात्री करण्यासाठी आणि परिणामकारकरीत्या शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी, शेतकऱ्यांचे उत्पन्न, व्यापार व वाणिज्य (प्रचालन व सुलभीकरण) अधिनियम, 2020 हा केंद्रिय अधिनियम महाराष्ट्र राज्यास लागू असतांना त्यात सुधारणा करण्याकरीता विधेयक) (पुर:स्थापित दि. 06.07.2021, विधानसभेत विचारार्थ दि. 06.07.2021) (मागे घेण्याचा ठराव दि. 23.12.2021).
  • सन 2021 चे महाराष्ट्र विधान सभा विधेयक क्र.- अत्यावश्यक वस्तू (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, २०२१ (अन्न व नागरी पुरवठ विभाग) (दुष्काळ, किंमतवाढ, नैसर्गिक आपत्ती यांचा अंतर्भाव असलेल्या असाधारण परिस्थितीमध्ये साठा मर्यादा लादून, उत्पादन, पुरवठा, वितरण विनियमित करण्याचा किंवा त्यास प्रतिबंध करण्याचा अधिकार राज्य शासनाकडे घेण्याकरीता, अत्यावश्यक वस्तू अधिनियम, 1955, हा केंद्रिय अधिनियम महाराष्ट्र राज्यास लागू असतांना त्याच्या कलम ३ मध्ये सुधारणा करण्याकरीता) (पुर:स्थापित दि. 06.07.2021, विधानसभेत विचारार्थ दि. 06.07.2021) (मागे घेण्याचा ठराव दि. 23.12.2021).

हिवाळी अधिवेशनात एकुण 24 विधेयके मंजूर |ऐतिहासिक शक्ती विधेयकासह अधिवेशनात 24 विधेयके मंजूर – उपमुख्यमंत्री अजित पवार
हिवाळी अधिवेशन महाराष्ट्र २८ विधेयके मंजूर


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.