Hot Widget

Type Here to Get Search Results !

आदिवासी भागातील आरोग्यकर्मींचे वेतन वाढवणार; स्पीड बोटच्या सहाय्याने नर्मदा काठावरील गावांना आरोग्य सुविधा देणार पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

आदिवासी भागातील आरोग्यकर्मींचे वेतन वाढवणार; स्पीड बोटच्या सहाय्याने नर्मदा काठावरील गावांना आरोग्य सुविधा देणार पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

आदिवासी भागातील आरोग्यकर्मींचे वेतन वाढवणार;
स्पीड बोटच्या सहाय्याने नर्मदा काठावरील गावांना आरोग्य सुविधा देणार
पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित


Adivasi TV India : नंदुरबार (जिमाका वृत्त) नंदुरबार जिल्हा हा केंद्र सरकाराने आकांक्षीत जिल्हा म्हणून घोषित केला असून आदिवासी दुर्गम भागात प्रतीकुल परिस्थितीत आरोग्यसेवा पुरविणाऱ्या डॉक्टर्स व आरोग्यकर्मींच्या वेतनात वाढ करण्यात येणार आहे. तसेच तरंगत्या दवाखान्यांच्या जागेवर लवकरच स्पीडबोटच्या मदतीने नर्मदा काठावरील गावांना आरोग्य सेवा दिली जाणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे. 


ते आज शहादा येथील ग्रामीण रूग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती हेमलता शितोळे, पंचायत समितीचे सभापती वीरसिंग ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य जिजाताई ठाकरे, के.डी. नाईक, गुलाब ठाकरे, राजीव जाधव, सामाजिक कार्यकर्ते डॉ. कांतीलाल टाटीया, इश्वर पाटील,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेश पाटील, डॉ. राजेश वसावे, डॉ. गोविंद शेल्टे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी येत्या दोन वर्षात 200 पेक्षा अधिक आरोग्य उपकेंद्रे, 56 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 11 ग्रामीण रूग्णालयांची निर्मिती व टाटा इन्स्टिट्युटच्या मदतीने नर्मदा काठावरील गावांनी स्पीडबोटी च्या मदतीने आरोग्य सुविधा सुरू केली जाणार असून त्यासाठी आवश्यकता पडल्यास आदिवासी विकास विभागातून निधी उपलब्ध करून दिला जाईल.


या सर्व निर्माण होणाऱ्या आरोग्य सुविधांसह इतर सुविधांशी वाड्या-पाड्यातला माणूस जोडला जावा यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक वाड्या-पाड्यात आणि गावात बारमाही रस्त्यांची निर्मिती येत्या दोन वर्षात केली जाणार आहे. व आज उद्घाटन झालेल्या ग्रामीण रूग्णालयास लवकरच उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा दिला जाणार आहे. त्याचबरोबर आदिवासी भागात प्रतीकुल परिस्थितीशी सामना करत आरोग्य सुविधा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व आरोग्यकर्मी यांना प्रोत्साहनपर वेतनवाढ देण्याचाही विचार सचिवस्तरावरील चर्चेत केला असल्याचे पालकमंत्री डॉ. गावित यांनी सांगितले. 


प्रत्येक कार्यालयात फेस रिडिंगद्वारे होणार हजेरी


  यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, आदिवासी दुर्गम भागात कनेक्टिव्हिटी वाढविण्यासोबतच या भागातील नागरिकांना चांगल्या सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी प्रत्येक कार्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांची हजेरी वेळेत असणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात अधिकारी, कर्मचारी यांच्या फेस रिडिंगद्वारे हजेरीचा राज्यातील आगळा वेगळा उपक्रम आपण जिल्ह्यात राबवणार असल्याचीही माहिती यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी दिली.


कुपोषण नियंत्रणात बचतगटांचा सहभाग वाढवणार
डॉ. सुप्रिया गावित


जिल्ह्यातील कुपोषण व सिकलसेल आजाराच्या नियंत्रणात लवकरच महिला बचत गटांचा सहभाग वाढवून त्यासाठीच्या उपययोजना अधिक बळकट केल्या जाणार आहेत. तसेच आज निर्माण झालेल्या शहादा ग्रामीण रूग्णालयाच्या माध्यमातून चांगल्या आरोग्य सुविधा अत्यंत कमीतकमी वेळेत स्थानिक व परिसरातील दुर्गम भागातील नागरिंकांना उपलब्ध होणार आहेत, असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी मनोगत व्यक्त करताना यावेळी सांगितले.


‘एम्स’ दर्जाच्या आरोग्य सुविधा देणारे माता व बाल रूग्णालय मंजूर

जिल्ह्यातील कुपोषणावर मात करण्यासाठी माता व बालकांचे आरोग्य अत्यंत महत्वाचे असून त्यासाठी केंद्र सरकारकडे वेळेवेळी पाठपुरावा करून 100 खाटांचे स्वतंत्र माता व बाल संगोपन रूग्णालयास मान्यता मिळाली असून या रूग्णालयात एम्स रूग्णालयांच्या दर्जाच्या सोयी-सुविधा रूग्णांना मिळणार आहेत. शहादा हे नंदुरबार जिल्ह्यातील मध्यवर्ती असे मोठे शहर आहे. आजूबाजूच्या दुर्गम भागातील लोकांना ग्रामीण रूग्णालयामुळे आरोग्य सुविधा मिळणे अधिक सुलभ होणार आहे. तसेच वाद्यकीय महाविद्यालयामुळे येथे सर्व प्रकारचे तज्ञ डॉक्टर्स जिल्ह्यात उपलब्ध होणार आहेत. कोरोनाकाळात वैद्यकीय महाविद्यालायास मिळालेली केंद्र सरकारची मान्यता व त्याच कालावधीत 100 विद्यर्थ्यांच्या प्रवेशासोबतच त्यासाठी भरघोस निधी ही मोठी उपलब्धी असल्याचे यावेळी खासदार डॉ. हिना गावित यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.